लोणार (गावकरी टाइम्स/प्रतिनिधी):
समाजातील तरुणांनी शिक्षणाच्या प्रवाहात राहून स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून प्रशासकीय सेवेत स्वतःचे स्थान निर्माण करणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन मान्यवरांनी येथे केले. लोणार येथील झमझम कॉलनी भागातील मदरसा अली हसन नदवी व डॉ. झाकीर हुसेन फंक्शन हॉलमध्ये जमीयत उलेमा लोणारच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय समाज सुधार प्रोग्राम व सत्कार सोहळ्यात ते बोलत होते.
या विशेष कार्यक्रमात लोणार परिसरातील चार गुणवंत विद्यार्थ्यांची पोलीस दल व महसूल विभागात निवड झाल्याबद्दल त्यांचा ट्रॉफी व पुष्पगुच्छ देऊन भव्य सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमात खालील यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला:
१. शेख शफाअत शेख शौकत (निवड: ठाणे सिटी पोलीस)
२. नगमा शेख शफाअत (निवड: नवी मुंबई पोलीस)
३. शेख साहिल शेख शकील (लोनी लव्हाळा - निवड: ठाणे सिटी पोलीस)
४. मोहम्मद आकिद खान निसार खान (निवड: उप अधीक्षक, भूमी अभिलेख, जालना)
प्रेरणादायी मार्गदर्शन
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मौलाना नसरुल्ला खान (नांदेड) यांनी स्पर्धा परीक्षा आणि तरुणांच्या प्रगतीवर मोलाचे मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी हाफिज अब्दुल हमीद (रिसोड) होते. तसेच मौलाना मुदस्सिर व मौलाना ओवैस खान यांचीही प्रमुख उपस्थिती होती. जमीयत उलेमा लोणारचे अध्यक्ष ॲड. रिझवान जद्दा यांनीही उपस्थित तरुणांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले.
उत्साहात संपन्न सोहळा
रात्री ८ वाजता सुरू झालेल्या या सोहळ्यात मदरसा अली हसन नदवीच्या विद्यार्थ्यांनी विविध शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. या सोहळ्याला परिसरातील मान्यवर, प्रतिष्ठित नागरिक आणि मोठ्या संख्येने महिला व पुरुष बांधव उपस्थित होते.
कार्यक्रमाची निजामत मौलाना रहमान व हाफिज राजिक यांनी केली. शेवटी ॲड. मोहम्मद रिझवान जद्दा व हाफिज राजिक यांनी सर्वांचे आभार मानले. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

0 Comments