सुलतानपूर (गावकरी टाइम्स/मोईन खान):
सुलतानपूर शहरातील मोकाट डुकरांच्या गंभीर समस्येवर ‘गावकरी टाइम्स’ने वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. या वृत्ताची आणि संतप्त गावकऱ्यांनी दिलेल्या उपोषणाच्या इशाऱ्याची दखल घेत अखेर प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. आज सकाळी बबन शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी गावात विशेष मोहीम राबवून मोकाट फिरणाऱ्या सर्व डुकरांना पकडल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
सुलतानपूर हे तालुक्यातील सर्वात मोठे गाव आणि वैद्यकीय शिक्षणाचे केंद्र असल्याने येथे दररोज नागरिकांची व विद्यार्थ्यांची मोठी वर्दळ असते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून गावातील रहिवासी गल्ल्या, मुख्य रस्ते, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळा परिसर तसेच वॉर्ड क्रमांक १ मधील रझा मशीद आणि मुस्लिम कब्रस्तान परिसरात डुकरांचा मुक्त संचार वाढला होता. अस्वच्छता, दुर्गंधी आणि अपघाताच्या धोक्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते.
या समस्येवर ग्रामस्थांनी ग्रामपंचायत, तहसीलदार, बीडीओ आणि पोलिसांना निवेदन देऊन १५ नोव्हेंबरपासून आमरण उपोषणाचा इशारा दिला होता. या जनआक्रोशाची आणि वास्तवाची सविस्तर बातमी ‘गावकरी टाइम्स’ने लावून धरली होती.
या बातमीचा जोरदार इम्पॅक्ट पाहायला मिळाला असून, ग्रामपंचायत प्रशासनाच्या हालचालीनंतर आज सकाळी बबन शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सुलतानपूर शहरात मोहीम राबवली. गावातील विविध भागांतून सर्व डुकरांना पकडून गावाबाहेर काढण्यात आले. वेळेत पावले उचलून समस्येचे निवारण केल्याबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले असून, ‘गावकरी टाइम्स’च्या रोखठोक भूमिकेचे कौतुक केले जात आहे.

0 Comments