देऊळगाव राजा शहरात सोमवारी रात्री दोन गटांत झालेल्या भीषण हाणामारीत शिवसेना (शिंदे गट) नगरसेवकासह दोघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक प्राथमिक माहिती समोर आली आहे. या थरारक घटनेमुळे संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मृत व्यक्तींची ओळख:
प्राथमिक माहितीनुसार, शिवसेना (शिंदे गट) नगरसेवक शेख अनवर अली आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) शी संबंधित आरिफ शेख (पठाण) अशी मृतांची नावे असल्याचे समोर येत आहे.
कधी आणि कुठे घडली घटना?
सोमवारी रात्री सुमारे ९:३० वाजता शहरात आयोजित कव्वालीच्या कार्यक्रमानंतर वाद उफाळून आला. हा वाद इतका विकोपाला गेला की दोन्ही गट थेट पोलीस ठाण्याच्या परिसरातच एकमेकांना भिडल्याची माहिती आहे.
वादाचे कारण:
प्राथमिक चर्चेनुसार लहान मुलांच्या भांडणातून वादाची ठिणगी पडली आणि नंतर त्याला जुन्या राजकीय वैमनस्याची किनार मिळाली. मात्र, हत्येचे नेमके कारण अद्याप अधिकृतपणे स्पष्ट झालेले नाही.
सध्याची परिस्थिती:
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. शहरात मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला असून शांतता राखण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. घटनेचा सविस्तर तपास पोलीस करत आहेत.

0 Comments