गाजर गवताचा वेढा आणि सापांचा वावर! लोणार कब्रस्तानात अपघाताची भीती; प्रशासनाकडे धाव

शिवसेना (शिंदे गट) नेते शेख लुकमान व नागरिकांचे नगर परिषदेला निवेदन
लोणार (गावकरी टाइम्स/फिरदोस खान):
लोणार शहरातील मुस्लिम कब्रस्तानमध्ये मोठ्या प्रमाणावर गाजर गवत वाढल्यामुळे तेथे विषारी साप व वन्य प्राण्यांचा वावर वाढला आहे. यामुळे दफनविधीसाठी येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, नगर परिषदेने तात्काळ तणनाशक फवारणी करून गाजर गवताची योग्य विल्हेवाट लावावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
याबाबत शिवसेना (शिंदे गट) चे नेते शेख लुकमान शेख उस्मान (रा. नई नगरी, लोणार) यांच्या नेतृत्वाखाली नगर परिषदेचे मा. मुख्याधिकारी यांना १० ऑगस्ट रोजी विनंती अर्ज सादर करण्यात आला.


गाजर गवतामुळे अपघाताची भीती

कब्रस्तानमध्ये वाढलेल्या घनदाट गवतामुळे सरपटणाऱ्या प्राण्यांचा धोका प्रचंड वाढला आहे. अंत्यसंस्कार किंवा दुवा-प्रार्थनेसाठी जाणाऱ्या नागरिकांच्या जीवाला यामुळं धोका निर्माण होत आहे. प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ स्वच्छता अभियान राबवावे आणि तणनाशक औषधांची फवारणी करावी, अशी जोरदार मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

स्थानिक नागरिकांचा पाठिंबा

या निवेदनावर शेख लुकमान यांच्यासह गजानन विश्वंभर मापारी, तौफीक कुरेशी, रफिक कुरेशी, मदार कुरेशी, नदीम कुरेशी, अख्तर कुरेशी आणि मोहसीन कुरेशी यांच्यासह अनेक नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
नगर परिषद प्रशासन यावर किती लवकर कारवाई करते, याकडे आता संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.
बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७ ——— बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७

Post a Comment

0 Comments