धक्कादायक! साखरखेर्डा येथे स्मशानभूमीत राहणाऱ्या महिलेची अंगावर डिझेल ओतून आत्महत्या

कौटुंबिक वादातून टोकाचे पाऊल; ३ निष्पाप चिमुकले पोरके, परिसरात हळहळ
साखरखेर्डा (गावकरी टाइम्स/जुबेर शाह):
येथील रोकडोबा हनुमान मंदिराच्या मागे असलेल्या हिंदू स्मशानभूमीत वास्तव्यास असलेल्या म्हसनजोगी समाजातील एका ३४ वर्षीय महिलेने अंगावर डिझेल ओतून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना शनिवारी (दि. ६ जून) सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली. शारदा प्रकाश धनसरवाड (वय ३४ वर्ष, मूळ रा. ढाणकी बिटरगांव, ता. उमरखेड, जि. यवतमाळ) असे मृत महिलेचे नाव आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून तिच्या तीन चिमुकल्या मुलांचे छत्र हरपले आहे.


वादावर तोडगा निघण्यापूर्वीच संपवले जीवन

​गेल्या अनेक दिवसांपासून हे कुटुंब साखरखेर्डा येथील स्मशानभूमीत स्वच्छतेचे काम करत होते. ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून त्यांना स्मशानभूमीत एक घरही बांधून दिले होते. पती प्रकाश धनसरवाड हा भिक्षुकी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होता. दरम्यान, एका प्रेमप्रकरणाच्या संशयावरून पती-पत्नीत गेल्या काही दिवसांपासून सतत वाद होत होते. शनिवारी या वादावर तोडगा काढण्यासाठी नातेवाईक येणार होते. मात्र, नातेवाईक पोहोचण्यापूर्वीच शारदा हिने स्मशानभूमीत प्रेत जाळण्यासाठी शिल्लक राहिलेले डिझेल अंगावर ओतून स्वतःला पेटवून घेतले.

​पोटच्या गोळ्यांना घराबाहेर काढले

​शारदा स्वतःला पेटवून घेत असताना ६ वर्षांच्या श्रावणी या चिमुरडीने आईला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र, शारदाने श्रावणी, शिवानी आणि कार्तिक या आपल्या तीनही निष्पाप मुलांना घराबाहेर हाकलून दिले आणि स्वतःला आगीच्या हवाली केले. मुलांच्या रडण्याचा आणि आरडाओरड्याचा आवाज ऐकून आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली, परंतु तोपर्यंत शारदाचा होरपळून मृत्यू झाला होता.

​प्रशासकीय उदासीनता; चिखलीहून मागवली रुग्णवाहिका

​घटनेची माहिती मिळताच साखरखेर्डा पोलीस स्टेशनचे ठाणेदार गजानन करेवाड आणि दुय्यम ठाणेदार संदीप मेधने यांनी तात्काळ फॉरेन्सिक टीमसह घटनास्थळी धाव घेतली. मात्र, दुर्दैवाची बाब म्हणजे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यासाठी स्थानिक पातळीवर एकही वाहन उपलब्ध झाले नाही. अखेर ठाणेदार करेवाड यांनी चिखली येथून रुग्णवाहिका बोलावून मृतदेह मेहकर येथे हलविला. तिथेही रात्री शवविच्छेदन न झाल्याने रविवारी सकाळी शवविच्छेदन करून साडेदहा वाजता शारदावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

​लोकप्रतिनिधींनी जपली माणुसकी

​या कठीण प्रसंगात माजी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ जाधव आणि सरपंच पती अमित जाधव यांनी माणुसकीचे दर्शन घडवले. त्यांनी अंत्यविधीसाठी आलेल्या मृत महिलेच्या सुमारे १०० नातेवाईकांसाठी राहण्याची, भोजनाची आणि अंत्यसंस्काराची संपूर्ण व्यवस्था केली.

​समाजाच्या मदतीची गरज!

"आई... आई..." म्हणून ओक्साबोक्सी रडणाऱ्या २ वर्षांची शिवानी, कार्तिक आणि ६ वर्षांची श्रावणी या मुलांचा आक्रोश उपस्थितांचे काळीज पिळवटून टाकणारा होता. ज्या कुटुंबाने शेकडो प्रेतांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमीची सेवा केली, आज त्याच कुटुंबातील चिमुकली मुले पोरकी झाली आहेत. या पोरक्या झालेल्या मुलांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी आता समाजाने मदतीचा हात पुढे करण्याची गरज निर्माण झाली आहे.
बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७ ——— बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७

Post a Comment

0 Comments