मध्यरात्रीच्या 'त्या' भयानक कृत्याने चिखली हादरली! इंजिनिअरच्या घरासमोर अघोरी जादूटोणा;अंगावर काटा आणणारा अघोरी प्रकार CCTV मध्ये कैद.

चिखली (गावकरी टाइम्स/प्रतिनिधी):
बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातून अंधश्रद्धा आणि जादूटोण्याच्या एका अतिशय खळबळजनक प्रकरणाने संपूर्ण परिसरात तीव्र संताप आणि भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. मकरध्वज खंडाळा येथे एका प्रतिष्ठित सॉफ्टवेअर इंजिनिअरच्या घरासमोर मध्यरात्रीच्या सुमारास अघोरी हेतूने जादूटोणा केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा संपूर्ण प्रकार घराबाहेर बसवलेल्या सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात कैद झाला असून, या फुटेजच्या आधारे चिखली पोलिसांनी तत्परता दाखवत आरोपीविरुद्ध थेट अमानुष व अघोरी प्रथा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.


मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, 
फिर्यादी प्रवीण संजय साळवे (वय २९, रा. मकरध्वज खंडाळा, ता. चिखली) हे बेंगळुरू येथील एका नामांकित खाजगी कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून कार्यरत आहेत. त्यांची पत्नी गावाकडील घरी वास्तव्यास असते. दिनांक १७ मे रोजी सकाळी ६:२० वाजेच्या सुमारास प्रवीण साळवे नेहमीप्रमाणे सकाळी फिरण्यासाठी बाहेर पडले होते. याच दरम्यान त्यांच्या पत्नीने त्यांना फोन करून घराच्या व्हरांड्यात एक पूर्ण लिंबू आणि एक अर्धवट कापलेले लिंबू पडलेले असल्याचे अत्यंत घाबरलेल्या अवस्थेत सांगितले. हा प्रकार ऐकताच साळवे यांनी तात्काळ घर गाठले असता, त्यांना प्रत्यक्ष दारात लिंबू टाकलेले दिसून आले.

CCTV मुळे अघोरी कट उघड!

घरासमोर अघोरी प्रकार झाल्याचा संशय आल्याने साळवे यांनी तात्काळ आपल्या घराबाहेरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. यामध्ये पहाटे ५:१३ वाजेच्या सुमारास एक संशयास्पद व्यक्ती अत्यंत सावधपणे दारात आली आणि तिने तिथे लिंबू टाकून जादूटोणा केल्याचे स्पष्टपणे दिसून आले. हा इसम 'शेख गणी उर्फ शेख दादू' असल्याचे फिर्यादीने ओळखले असून, त्यानेच कुटुंबाला मानसिक त्रास देण्याच्या व दहशत माजवण्याच्या उद्देशाने हे अघोरी कृत्य केल्याचा आरोप आहे.

जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

या अत्यंत गंभीर आणि भीतीदायक प्रसंगानंतर, फिर्यादी प्रवीण साळवे यांनी ऑल इंडिया पँथर सेनेचे विदर्भ अध्यक्ष संकेत जाधव यांच्याशी संपर्क साधून घडलेल्या सर्व प्रकाराची माहिती दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन संकेत जाधव यांनी तात्काळ पीडित कुटुंबासह चिखली पोलीस स्टेशन गाठले आणि पोलीस प्रशासनाशी सविस्तर चर्चा करून आरोपीवर कडक कारवाई करण्याची मागणी केली.

चिखली पोलिसांनी या प्रकरणाची अत्यंत गांभीर्याने दखल घेत तातडीने पावले उचलली आहेत. पोलिसांनी आरोपी शेख गणी उर्फ शेख दादू याच्या विरोधात 'महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक अधिनियम २०१३' च्या कलम ३(२) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील सखोल तपास पोलीस हवालदार मगर करत आहेत.



बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७ ——— बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७

Post a Comment

0 Comments