रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे कवी अजीम नवाज राही 'रत्नाकर काव्यपुरस्कारा'ने सन्मानित!

साखरखेर्डा (गावकरी टाइम्स/जुबेर शाह):
मराठी साहित्यविश्वातील आघाडीचे आणि अत्यंत लोकप्रिय कवी, वक्ते अजीम नवाज राही यांच्या “वळीवाच्या वेळा” या बहुचर्चित कवितासंग्रहाला यंदाचा दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा, कोल्हापूरचा प्रतिष्ठेचा “रत्नाकर उत्कृष्ट काव्यपुरस्कार” जाहीर झाला आहे. दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे अध्यक्ष भीमराव धुळूबुळू व सचिव डॉ. विनोद कांबळे यांनी अधिकृतपणे ही घोषणा केली.

 

जळगाव येथील 'अथर्व पब्लिकेशन'तर्फे प्रकाशित झालेल्या या कवितासंग्रहासाठी राही यांना १० हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह व मानपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. या पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन २४ मे २०२६ रोजी सकाळी १०:३० वाजता 'शेठ रामभाई सामाणी स्मृती हॉल' येथे करण्यात आले असून, महाराष्ट्रातील नामवंत साहित्यिकांच्या उपस्थितीत हा भव्य सोहळा पार पडणार आहे.

शोषितांच्या वेदनेला वाचा फोडणारी कविता

प्रख्यात कवी, श्रोताप्रिय वक्ते व नामांकित निवेदक म्हणून अजीम नवाज राही यांचे मराठी साहित्यविश्वात मोठे नाव आहे. त्यांची कविता केवळ शब्दांचा खेळ न राहता समाजमनाचे वास्तव प्रतिबिंब ठरते. त्यांच्या कवितेत शेतकरी, शेतमजूर, कामगार, शोषित आणि उपेक्षितांच्या वेदना प्रभावीपणे व्यक्त होतात. धर्म, जात, पंथ यांच्या सीमारेषा ओलांडून मानवी मूल्यांची जपणूक करणारी त्यांची शैली वाचकांना आणि रसिकांना भावते. “वळीवाच्या वेळा” या संग्रहात समकालीन वास्तव, भाषिक समृद्धी आणि संवेदनशीलता यांचा सुरेख मिलाफ पाहायला मिळतो.

पाच सकस कवितासंग्रह आणि शैक्षणिक अभ्यासक्रमात स्थान

अजीम नवाज राही यांच्या लेखणीतून आजवर “व्यवहाराचा काळा घोडा”, “कल्लोळातला एकांत”, “वर्तमानाचा वतनदार”, “तळमळीचा तळ” आणि “वळीवाच्या वेळा” असे पाच दर्जेदार कवितासंग्रह रसिकांच्या भेटीस आले आहेत. त्यांच्या या साहित्यिक योगदानाची दखल घेऊन त्यांच्या कवितांचा समावेश इयत्ता दहावी, अकरावी तसेच महाराष्ट्रातील ११ विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात करण्यात आला आहे.

पुरस्कारांची दैदिप्यमान परंपरा

अजीम नवाज राही यांच्या साहित्यसेवेचा गौरव यापूर्वीही अनेक मोठ्या पुरस्कारांनी झाला आहे. त्यांना महाराष्ट्र शासनाचा कवी केशवसुत पुरस्कार, महाराष्ट्र फाउंडेशन साहित्य पुरस्कार, विदर्भ साहित्य संघाचा शरदचंद्र मुक्तीबोध पुरस्कार, नारायण सुर्वे पुरस्कार, इंदिरा संत पुरस्कार, लोकमत साहित्य पुरस्कार, कुसुमाग्रज पुरस्कार आणि जिजाऊ साहित्यरत्न पुरस्कार यांसारख्या अनेक मानाच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. या नव्या पुरस्कारामुळे त्यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून, संपूर्ण जिल्ह्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७ ——— बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७

Post a Comment

0 Comments