समृद्धी महामार्गावर थरार! १२ लाखांची रोकड लुटणारी आंतरराज्य टोळी जेरबंद; बुलढाणा गुन्हे शाखेची फिल्मी स्टाईल कारवाई

दुसरबीड(गावकरी टाइम्स/गुलशेर शेख):
समृद्धी महामार्गावर प्रवाशांच्या मनात दहशत निर्माण करणाऱ्या एका मोठ्या आंतरराज्य दरोडेखोर टोळीला जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला मोठे यश आले आहे. गुजरातच्या व्यापाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवून लुटणाऱ्या ८ आरोपींना बीड जिल्ह्यातून अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून १२.४८ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

 

नेमकी घटना काय?

२ मे रोजी सकाळी १०.४५ च्या सुमारास फिर्यादी अभयसिंह वाघेला (रा. गुजरात) हे नागपूरहून १२ लाखांची रोकड घेऊन स्कॉर्पिओने जात होते. दुसरबीड टोलनाक्याजवळ टायरमधील हवा तपासण्यासाठी ते थांबले असता, मागून आलेल्या बोलेरो आणि इनोव्हामधील १० ते १२ जणांनी त्यांना घेराव घातला. आरोपींनी फिर्यादीला बेदम मारहाण करत पिस्तुलाचा धाक दाखवला आणि त्यांची स्कॉर्पिओ व रोकड घेऊन पसार झाले.

गुन्हे शाखेचा 'खाक्या' आणि धाडसी पाठलाग

घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवली. तांत्रिक विश्लेषण आणि खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही टोळी बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील अंबा साखर कारखाना परिसरात लपल्याचे समजले. पोलिसांनी कोणतीही वेळ न घालवता सापळा रचला आणि जीवावर उदार होऊन या खतरनाक टोळीला बेड्या ठोकल्या.

टोळीचे धागेदोरे पाच राज्यांत!

अटक करण्यात आलेले आरोपी हे साधेसुधे चोर नसून आंतरराज्य गुन्हेगार आहेत. तपासात धक्कादायक माहिती समोर आली असून, हे आरोपी महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक, गुजरात आणि जम्मू-काश्मीर अशा पाच वेगवेगळ्या राज्यांतील रहिवासी आहेत.

जप्त केलेला मुद्देमाल:

रोख रक्कम: १ लाख ८० हजार रुपये
शस्त्रे: १ देशी बनावटीची पिस्टल, ४ जिवंत काडतुसे
वाहने: गुन्ह्यात वापरलेली इनोव्हा आणि बोलेरो
इतर: मोबाईल व इतर साहित्य (एकूण किंमत: १२.४८ लाख)

या टीमने फत्ते केली मोहीम

ही धडक कारवाई स्थानिक गुन्हे शाखा, बुलढाणा आणि तांत्रिक विश्लेषण विभागाच्या पथकाने केली. यामध्ये पोनि. सुनील अंबुलकर, पोउपनि. प्रताप बाजड आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा समावेश होता. या कारवाईमुळे समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
बुलढाणा पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे!
बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७ ——— बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७

Post a Comment

0 Comments