शेतकऱ्यांचा एल्गार: कॅनमध्ये डिझेल न मिळाल्यास कृषी कामे ठप्प होण्याच्या भीतीने तीव्र संताप
संग्रामपूर तालुक्यात सध्या डिझेल टंचाईची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली असून, यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. खरीप हंगामाच्या तोंडावर शेती मशागतीची कामे वेगाने सुरू असतानाच, पेट्रोल पंप चालकांकडून शेतकऱ्यांना कॅनमध्ये डिझेल देण्यास नकार दिला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या मनमानी कारभाराविरोधात शेतकऱ्यांनी आता आंदोलनाचे हत्यार उपसले असून, मागण्या मान्य न झाल्यास येत्या सोमवारी (ता. २५) संग्रामपूर तहसील कार्यालयावर तीव्र ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
वेळ आणि पैशांचा अपव्यय; शेतीची कामे खोळंबली
ऐन पेरणीपूर्व मशागतीच्या काळात डिझेल मिळत नसल्याने शेतकऱ्यांचा वेळ, पैसा आणि इंधनाचा मोठ्या प्रमाणावर अपव्यय होत आहे. डिझेलअभावी तालुक्यातील ट्रॅक्टर, पाण्याचे पंप आणि इतर कृषी यंत्रणा जागेवरच बंद पडण्याची वेळ आली आहे. यामुळे शेतीची कामे पूर्णपणे खोळंबली असून, वेळेवर पाऊस आल्यास पेरण्या कशा करायच्या, असा यक्षप्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.
तहसीलदारांना निवेदन; नियमांची शिथिलता आणण्याची मागणी
या गंभीर समस्येवर तोडगा काढण्यासाठी संतप्त शेतकऱ्यांनी संग्रामपूरच्या तहसीलदारांना एक लेखी निवेदन दिले. "प्रशासनाने या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करावा. शेतकऱ्यांना ७/१२ उतारा आणि ट्रॅक्टरच्या कागदपत्रांची पडताळणी करून कॅनमध्ये डिझेल उपलब्ध करून देण्याचे आदेश पेट्रोल पंप चालकांना द्यावेत," अशी आग्रही मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांची उपस्थिती
प्रशासनाने या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास सोमवारी होणाऱ्या ठिय्या आंदोलनात तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. निवेदन देतेवेळी विजयभाऊ मारोडे, विजयभाऊ ठाकरे, दशरथभाऊ वानखेडे, अक्षयभाऊ शिरसाट, गोपालभाऊ दोरकर, गजाननभाऊ वेरुळकर, रामभाऊ टेकाडे यांच्यासह परिसरातील असंख्य शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. आता यावर प्रशासन काय सकारात्मक निर्णय घेते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

0 Comments