सुलतानपूर (गावकरी टाइम्स/प्रतिनिधी): लोणार तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक बातमी समोर आली आहे. एकीकडे सर्वसामान्य नागरिक आणि शेतकरी डिझेल-पेट्रोलसाठी पंपावर हेलपाटे घालत असताना, दुसरीकडे मात्र ग्राहकांना इंधन नाकारून चक्क २०० लिटर डिझेलची बेकायदेशीर साठेबाजी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. लोणार तालुक्यातील अंजनी खुर्द येथील 'कालिका माता पेट्रोल पंपावर' पुरवठा विभागाने हा मोठा छापा टाकला आहे. या प्रकरणी साठेबाजी आणि शेतकऱ्याला बेदम मारहाण केल्याप्रकरणी पेट्रोल पंप चालकासह कर्मचाऱ्यांवर मेहकर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
इंधनाची कृत्रिम टंचाई आणि गुप्त साठा
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, मेहकर ते जालना महामार्गावर अंजनी खुर्द शिवारात 'कालिका माता पेट्रोल पंप' कार्यरत आहे. या महामार्गावरील मुख्य पंप असल्याने येथे नेहमीच शेतकरी आणि वाहनधारकांची मोठी गर्दी असते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पंप चालकाकडून ग्राहकांना इंधन संपल्याचे सांगून परत पाठवले जात होते. प्रत्यक्षात मात्र, कंपनीकडून मिळणाऱ्या इंधनातून ग्राहकांना डिझेल न देता, पंप चालकाने चक्क २०० लिटर डिझेल अतिरिक्त बॅरलमध्ये भरून ते पंपाच्या पाठीमागे असलेल्या एका टीनशेडमध्ये लपवून ठेवले होते. काळ्या बाजारात चढ्या दराने विक्री करण्यासाठीच हा साठा लपवला गेल्याचा संशय व्यक्त होत आहे.
इंधनाच्या वादातून शेतकऱ्याला बेदम मारहाण
या संपूर्ण काळ्या कारनाम्याचा भांडाफोड एका वादामुळे झाला. १७ मे रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास उद्धव पिसे नावाचे शेतकरी या पंपावर डिझेल घेण्यासाठी गेले होते. त्यावेळी इंधन देण्यावरून पंपावरील कर्मचाऱ्यांशी त्यांचा वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, पंपावरील दोन कर्मचाऱ्यांनी शेतकरी उद्धव पिसे यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत होता.
तहसीलदार भूषण पाटील यांचा धडक छापा
शेतकऱ्याला झालेली मारहाण आणि पंपावर मोठ्या प्रमाणावर अवैध डिझेल साठवून ठेवल्याची गुप्त माहिती लोणारचे तहसीलदार भूषण पाटील यांना मिळाली. माहिती मिळताच तहसीलदार पाटील यांनी पुरवठा विभागाच्या पथकासह तात्काळ कालिका माता पेट्रोल पंपावर धडक दिली.
प्रशासनाने पंपाची आणि मागच्या बाजूला असलेल्या टीनशेडची कसून पाहणी केली असता, पथकाला तिथे लपवून ठेवलेला २०० लिटर डिझेलचा ड्रम आढळून आला. इंधनाच्या मुख्य टाकीशिवाय असा अतिरिक्त साठा करून ठेवणे बेकायदेशीर असल्याने प्रशासनाने तात्काळ हा साठा जप्त केला.
पंप चालकासह कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल
या मोठ्या कारवाईनंतर पुरवठा निरीक्षण अधिकारी आरती दांडगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून १८ मे रोजी मेहकर पोलीस ठाण्यात कालिका माता पेट्रोल पंपाच्या संचालकाविरुद्ध (ऑपरेटर) अवैध साठेबाजी आणि जीवनावश्यक वस्तू कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच, शेतकरी उद्धव पिसे यांना मारहाण केल्याप्रकरणी पंपावरील त्या दोन्ही दबंग कर्मचाऱ्यांवरही मेहकर पोलिसांनी वेगळा गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतले आहे. या धडक कारवाईमुळे परिसरात साठेबाजी करणाऱ्या इतर पंप चालकांचे धाबे दणाणले असून, तहसीलदार भूषण पाटील यांच्या या भूमिकेचे शेतकऱ्यांकडून स्वागत केले जात आहे.

0 Comments