नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरातील बर्डे प्लॉट भागात २५ एप्रिलच्या रात्री एका लग्नसमारंभाचे आयोजन करण्यात आले होते. स्थानिक स्मशानभूमीजवळ डीजेच्या तालावर अनेक तरुण जल्लोषात नाचत होते. याच दरम्यान, शोएब खान अमीन खान (वय २३ वर्ष) याचा नाचताना दुसऱ्या एका तरुणाला चुकून धक्का लागला.
हा धक्का लागल्याच्या कारणावरून दोघांमध्ये बाचाबाची झाली. सुरुवातीला किरकोळ वाटणारा हा वाद काही वेळातच अत्यंत विकोपाला गेला.
टोळक्याचा जीवघेणा हल्ला
वादाचा राग मनात धरून ४ ते ५ जणांच्या टोळक्याने संगनमत करून शोएबवर हल्ला चढवला. आरोपींनी धारदार शस्त्रे आणि फायटरचा वापर करून शोएबवर सपासप वार केले. या भीषण हल्ल्यात शोएब रक्ताच्या थारोळ्यात पडला. त्याला तातडीने खामगाव येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
परिसरात तणावाचे वातावरण
भरवस्तीत झालेल्या या खुनाच्या घटनेमुळे संपूर्ण बर्डे प्लॉट परिसरात दहशतीचे सावट पसरले आहे. घटनेची माहिती मिळताच खामगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
पोलिस तपास सुरू:
याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असून, फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. एका आनंदाच्या सोहळ्याचे रक्तरंजित शेवट झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

0 Comments