मित्राच्या लग्नासाठी निघालेल्या तरुणांवर काळाचा घाला; भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू, तर दोघे गंभीर


चिखली (गावकरी टाइम्स/प्रतिनिधी):
जिल्ह्यातील चिखली तालुक्यात आज दुपारी एक हृदयद्रावक घटना घडली आहे. मित्राच्या लग्नाचा आनंद साजरा करण्यासाठी घराबाहेर पडलेल्या तीन तरुणांच्या बुलेटला भीषण अपघात झाला. चिखली-जालना रोडवरील अंधेरा फाट्याजवळ हा अपघात झाला असून, यामध्ये २० वर्षीय तरुणाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.


नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, चिखली येथील तीन तरुण आपल्या एका मित्राच्या लग्नासाठी बुलेटने अंबड (जि. जालना) येथे निघाले होते. आज दुपारी १२:३० वाजेच्या सुमारास त्यांची दुचाकी अंधेरा फाटा परिसरात आली असता, चालकाचे बुलेटवरील नियंत्रण सुटले. भरधाव वेगातील बुलेट थेट रस्ता दुभाजकावर (डिव्हायडर) जाऊन आदळली. हा अपघात इतका भीषण होता की, बुलेटचा चक्काचूर झाला आणि तरुण रस्त्यावर फेकले गेले. 

मृत आणि जखमींची माहिती

मृत: ओम जमदार (वय २० वर्ष, रा. चिखली) – याचा जागीच मृत्यू झाला.
गंभीर जखमी: जय जमदार आणि अभी भवर (दोघेही २० वर्ष, रा. चिखली) – या दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.

मदतीसाठी धावले स्थानिक नागरिक

अपघात होताच परिसरात मोठा आवाज झाला, ज्यामुळे स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने रुग्णवाहिकेतून चिखली येथील खासगी रुग्णालयात (जवंजाळ हॉस्पिटल) हलवण्यात आले. मृत ओमचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

अंधेरा पोलिसांकडून तपास सुरू

घटनेची माहिती मिळताच अंधेरा पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे. ज्या घरात लग्नाच्या गाठी बांधल्या जाणार होत्या, तिथे या अपघाताच्या बातमीने आनंदावर विरजण पडले आहे.


बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७ ——— बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७

Post a Comment

0 Comments