बुलढाणा(गावकरी टाइम्स): बुलढाणा शहरात आज 'शिवाजी कोण होता' या पुस्तकाच्या वाचनाच्या कार्यक्रमावरून मोठा राजकीय गदारोळ पाहायला मिळाला. आमदार संजय गायकवाड यांच्या समर्थकांनी पुकारलेल्या या आंदोलनादरम्यान आंदोलक आणि पोलिसांमध्ये जोरदार झटापट झाली. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.
बातमी सविस्तर:
गोविंद पानसरे लिखित 'शिवाजी कोण होता' या पुस्तकाच्या वाचनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र, या कार्यक्रमाला विरोध करत आमदार संजय गायकवाड यांचे समर्थक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला होता.
पोलिसांची मोठी कारवाई:
परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून पोलिसांनी घटनास्थळी कडेकोट बंदोबस्त तैनात केला होता. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य बळाचा वापर केला आणि सुमारे २०० ते ३०० कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला नेले. यामध्ये महिला कार्यकर्त्यांचाही मोठ्या प्रमाणावर समावेश होता.
झटापटीत आंदोलक जखमी:
आंदोलनस्थळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या ओढाताणीत एका आंदोलकाचा हात फॅक्चर झाल्याची माहिती समोर आली आहे. वाढत्या उष्म्यात ही परिस्थिती अधिक बिकट होत असल्याने पोलिसांनी आंदोलकांना संयम राखण्याचे आवाहन केले होते. जखमी आंदोलकासाठी घटनास्थळी तात्काळ रुग्णवाहिका पाचारण करण्यात आली.
पुस्तकाचे वाचन रखडले:
एकीकडे आंदोलनाचा जोर सुरू असताना, ज्या पुस्तकाच्या वाचनाचा कार्यक्रम होणार होता, तो मात्र पूर्ण होऊ शकला नाही. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे आंदोलक आणि आयोजक समोरासमोर येण्यापूर्वीच परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात आले. मात्र, अद्यापही शहरात तणावपूर्ण शांतता असून पोलीस परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

0 Comments