१० वी, १२ वीच्या निकालाला विलंबाचे सावट; मनविसे आक्रमक, जिल्हाभर आंदोलनाचा इशारा!


बुलडाणा(गावकरी टाइम्स/प्रतिनिधी):
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे यंदा १० वी आणि १२ वीच्या निकालांना विलंब होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना (मनविसे) आक्रमक झाली असून, विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

 

निकालाचा पेच काय?

शिक्षण मंडळाच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या पदोन्नती आणि बदलीच्या नियमांविरोधात २८ एप्रिलपासून बेमुदत 'काम बंद' आंदोलनाची हाक दिली आहे. मंडळाचे उपाध्यक्ष विठ्ठल सरोदे यांनी स्पष्ट केले की, वारंवार पत्रव्यवहार करूनही प्रशासनाने सकारात्मक तोडगा काढलेला नाही. यामुळे निकाल तयार करण्याच्या प्रक्रियेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

"विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ चालणार नाही!"

या गंभीर विषयावर मनविसेचे बुलढाणा जिल्हा सचिव कृष्णा भैय्या घुले यांनी प्रशासनाला कडक शब्दांत सुनावले आहे. त्यांनी म्हटले की:
"निकालात विलंब होणे ही बाब अत्यंत गंभीर असून याचा थेट परिणाम हजारो विद्यार्थ्यांच्या पुढील प्रवेश प्रक्रियेवर होणार आहे. विद्यार्थ्यांच्या संयमाची परीक्षा न पाहता प्रशासनाने तात्काळ पर्यायी व्यवस्था करून निकाल वेळेत जाहीर करावेत."

आंदोलनाचा इशारा

जर प्रशासनाने यावर लवकर तोडगा काढला नाही, तर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना शांत बसणार नाही. निकाल वेळेत न लागल्यास बुलढाणा जिल्हाभर तीव्र रस्ता रोको आणि जनआंदोलन छेडले जाईल, असा इशारा कृष्णा घुले यांनी दिला आहे. निकालात होणाऱ्या विलंबामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची असेल, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.
बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७ ——— बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७

Post a Comment

0 Comments