धक्कादायक: "मुलाबाळांसह घराबाहेर काढेन!" सुल्ताना बी च्या धमकीनंतर विवाहितेची आत्महत्या; रुबीना बी यांच्या मृत्यूने चिखली सुन्न.

चिखली (गावकरी टाइम्स/प्रतिनिधी):
पैसे आणि आर्थिक व्यवहाराच्या वादातून एका विवाहित महिलेचा वारंवार मानसिक छळ केल्यामुळे, तिने टोकाचे पाऊल उचलल्याची धक्कादायक घटना चिखली तालुक्यातील 'मेरा खुर्द' येथे समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास वेगाने सुरू केला आहे.

 

काय आहे नेमके प्रकरण?

मिळालेल्या माहितीनुसार, मृत महिला रुबीना बी अकिल शाह (वय ३३) या सुमारे दोन वर्षांपूर्वी एका ३० हजार रुपयांच्या आर्थिक व्यवहारात मध्यस्थ होत्या. या व्यवहारातील पैसे परत न मिळाल्यामुळे, सुल्ताना बी सलीम शेख हिने रुबीना बी यांनाच जबाबदार धरले होते. याच कारणावरून सुल्ताना बी गेल्या काही काळापासून रुबीना यांना सतत धमकावत होती.

धमक्यांमुळे मानसिक तणाव

तक्रारीत नमूद केल्यानुसार, "पैसे दिले नाही तर तुला व तुझ्या मुलांना घराबाहेर काढेन, तुझा जीव घेईन," अशा शब्दांत आरोपी महिलेने मृत रुबीना बी यांना धमकावले होते. ६ मे रोजी संध्याकाळी पुन्हा एकदा या दोघींमध्ये याच पैशांवरून जोरदार वाद झाला. या सततच्या त्रासामुळे आणि दहशतीमुळे रुबीना बी प्रचंड मानसिक दडपणाखाली होत्या.

विहिरीत उडी घेऊन संपवले जीवन

६ मे रोजी रात्रीच्या सुमारास रुबीना बी यांनी गावातील दीपक खरात यांच्या शेतातील विहिरीत उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. ७ मे रोजी सकाळी ही हृदयद्रावक घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली.

मृत महिलेचे वडील मुक्तार शाह यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी सुल्ताना बी सलीम शेख हिच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गंभीर आरोप ठेवत गुन्हा नोंदवला आहे. या घटनेमुळे संपूर्ण चिखली तालुक्यात हळहळ व्यक्त होत असून, आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे.


बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७ ——— बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७

Post a Comment

0 Comments